
सोलापूर, 15 जून (हिं.स.) मंगळवेढा येथील एका महिलेची तब्बल दहा वर्षांपासून असलेली जटा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांच्या यशस्वी समुपदेशनामुळे काढण्यात आली. या निर्णयामुळे संबंधित महिला अंधश्रद्धेच्या विळख्यातून तसेच दीर्घकाळ सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक त्रासातून मुक्त झाली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी नैसर्गिक कारणांमुळे महिलेच्या केसांचा मोठा गुंता होऊन जटा निर्माण झाली होती. मात्र, समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे ती 'यल्लाम्मा देवीचा कोप' किंवा 'दैवी संकेत' असल्याचे मानले गेले. जटा कापल्यास अनर्थ होईल, या भीतीपोटी महिलेने ती अनेक वर्षे तशीच ठेवली.यामुळे तिला सतत डोकेदुखी, खाज सुटणे, मानेवर आणि मणक्यावर ताण येणे अशा विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रवि सांगोलकर, विनायक माळी, सक्षम घोडके, दादा गंगधरे आणि बिरा कांबळे यांनी महिलेच्या घरी भेट देऊन तिचे व कुटुंबीयांचे समुपदेशन केले.कार्यकर्त्यांनी जटा ही कोणतीही दैवी शक्ती नसून केसांची योग्य स्वच्छता न राखल्याने निर्माण झालेली वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगता येणारी अवस्था असल्याचे पुराव्यांसह स्पष्ट केले. तसेच जटा कापल्याने कोणताही अपाय होत नाही, उलट आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा विश्वास निर्माण केला.समुपदेशनानंतर महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी जटा काढण्यास संमती दिली. या उपक्रमामुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला असून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड