आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – दादाजी भुसे
नंदुरबार, 15 जून (हिं.स.) : “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगत
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


नंदुरबार, 15 जून (हिं.स.) : “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे,” असे प्रतिपादन दादाजी भुसे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या शुभारंभानिमित्त आणि प्रवेशोत्सव-आनंदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमश्या पाडवी, डॉ. मित्ताली सेठी, चंद्रकांत पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरात शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत असल्याचे सांगताना शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

तोरणमाळ येथील आवासीय विद्यालयाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, 20 शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेले हे शिक्षणकेंद्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही येथे दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसंदर्भात बोलताना भुसे यांनी येत्या सहा महिन्यांत विद्यालयात बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांची दरमहा आरोग्य तपासणी केली जाईल आणि शाळेसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय ‘राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण’, सैनिक शिक्षण, योगासने आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा मानस असून, तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी क्रीडा आणि पर्यटन विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

“आमच्या भागातील आदिवासी मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत. त्यांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे आवश्यक आहे. तसेच महादेव मंदिर आणि यशवंत तलाव परिसराचा पर्यटन विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासह क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रातील विकासासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासन दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

“शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोरणमाळ येथील शैक्षणिक केंद्रात विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि नवोपक्रम आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांसाठी क्रीडा अकादमी, आधुनिक स्पोर्ट्स ट्रॅक, विज्ञान प्रयोगशाळा आणि ‘मेकर्स लॅब’ उभारण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ‘पिअर लर्निंग’सारख्या अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि शुभेच्छांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शासनाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि पायाभूत सुविधांवर दिलेला भर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande