
सोलापूर, 15 जून (हिं.स.)राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यभरातील खासगी सोनोग्राफी केंद्रांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ पद्धतीने अचानक तपासण्या करण्यात येणार आहेत.राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची विशेष पथके शहर आणि जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी केंद्रांवर अचानक छापे टाकून सखोल तपासणी करणार आहेत.या मोहिमेअंतर्गत पुणे येथील कुटुंब कल्याण कार्यालयाच्या आरोग्य उपसंचालकांनी शहर तसेच बार्शी येथील विविध खासगी सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळातही राज्यातील विविध ठिकाणच्या सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. स्थानिक प्राधिकरणांच्या समन्वयाने नियमित भेटी घेऊन केंद्रांच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आरोग्य सेवा उपसंचालकांनी दिला आहे. या तपासणी मोहिमेत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार असून बेकायदेशीर गर्भलिंग निदान रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड