
रायगड, 19 जून (हिं.स.) : महाड शहरातील नाते पोस्ट ऑफिससाठी नाते परिसरात भाडेतत्त्वावर योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय डाक विभागाने आवाहन केले आहे. या संदर्भात इच्छुक जागामालकांकडून लेखी अर्ज मागविण्यात आले आहेत.
डाक विभागाच्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिससाठी 400 ते 650 चौरस फूट क्षेत्रफळाची सुव्यवस्थित व वापरण्यास योग्य जागा आवश्यक आहे. इच्छुकांनी अपेक्षित मासिक भाड्याचा उल्लेख करून आपले अर्ज अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 6 जुलै 2026 रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
डाक विभागाने स्पष्ट केले आहे की, जागेची आवश्यक दुरुस्ती व सुधारणा जागामालकाने स्वतःच्या खर्चाने करावी लागेल. तसेच कोणतीही आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स) डाक विभागाकडून दिली जाणार नाही.
याशिवाय इमारतीत स्वतंत्र वीज मीटर, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, स्नानगृह व इतर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. संबंधित जागेसाठी पाच वर्षांचा करारनामा देखील जागामालकाला स्वतःच्या खर्चाने करावा लागणार आहे.
नाते परिसरातील इच्छुक नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाक अधीक्षक, रायगड मंडळ, अलिबाग यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)