
लातूर, 19 जून (हिं.स.)। स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतील काही वाक्यांची मोडतोड करून आणि संदर्भ बदलून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केला आहे. तसेच अशा प्रकारे ट्रोलिंग करणाऱ्या मंडळींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉ. काळगे यांनी म्हटले आहे की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यानंतर मतदारांनी भरघोस मताधिक्याने निवडून देत लोकसभेत पाठविले. काँग्रेस पक्ष आणि जनतेने दाखविलेला विश्वास हीच आपल्यासाठी सर्वात मोठी भेट असून तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण जनसेवेचे व्रत स्वीकारले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यापासून लातूर लोकसभा मतदारसंघासह राज्य व देशातील जनतेचे प्रश्न लोकसभेत आणि शासनाकडे सातत्याने मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत अनेक प्रश्न मार्गी लागले असून शेतकरी, कष्टकरी, उद्योग व व्यापार क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यश आल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. काळगे म्हणाले की, पत्रकारांनी त्यांच्या मूळ वैद्यकीय व्यवसायाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे वैद्यकीय सेवेला पुरेसा वेळ देता येत नसल्याने त्या क्षेत्रात काही प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र या विधानाचा चुकीचा अर्थ काढून काही मंडळी समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांद्वारे दिशाभूल करणारा प्रचार करत आहेत.
काँग्रेस पक्षाने दिलेली संधी आणि लातूरच्या मतदारांनी दिलेले आशीर्वाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यातून मिळणारे समाधान माझ्यासाठी अमूल्य आहे. त्याची तुलना आर्थिक किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
अनेक वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंतर स्वतःच्या इच्छेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केला असल्याचे सांगत डॉ. काळगे यांनी निवडणुकीत मिळालेले प्रत्येक मत लाखमोलाचे असल्याची भावना व्यक्त केली. जनतेचे प्रेम आणि विश्वास हे कोणत्याही आर्थिक मोजमापापलीकडचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
काँग्रेस पक्ष, मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार बांधव यांच्या कायम ऋणात राहून जनसेवा सुरू ठेवणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis