
लातूर, 19 जून, (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींसाठी आधार संलग्न ‘एनसीएमसी एनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लवकरच शालेय, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या स्मार्ट कार्डचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या एसटी पाससाठी आता ‘सरल’ आणि ‘अपार’ क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारक प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील सर्व आगारांमध्ये एनसीएमसी कार्ड वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
१६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता विद्यार्थ्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना मासिक सवलतीचा पास मिळविण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक राहणार आहे. यासाठी लागणारा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जातील माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ती प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर हा अर्ज संबंधित आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत एजंटकडे जमा करावा लागणार आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा पालकांचा कार्यरत मोबाईल क्रमांक देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून पावती दिली जाईल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत कार्ड छापून संबंधित आगारात उपलब्ध करून दिले जाईल. आगारात पॉस (POS) मशिनद्वारे कार्ड सक्रिय केल्यानंतर ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, नोंदणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी आवश्यक कागदपत्रे, आधारशी संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक तसेच इतर आवश्यक माहितीची पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन लातूर विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis