
गडचिरोली, 19 जून (हिं.स.)
मागील ११ वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार असलेल्या बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) या नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तो माओवाद्यांना मदत करणाऱ्या 'जनमिलिशिया' संघटनेशी संबंधित होता.
आरोपी बापू जनगम विरुद्ध खुनाचा गुन्हा (कलम ३०२), खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), शासकीय सेवकांवर हल्ला करणे यासह अनेक गंभीर गुन्हे पोलीस स्टेशन असरल्ली येथे दाखल आहेत. २०१५ मधील एका खुनाच्या गुन्ह्यापासून तो फरार होता, तर या गुन्ह्यातील सह-आरोपीला न्यायालयाने आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात आल्याची गुप्त माहिती मिळताच, असरल्ली पोलिसांच्या पथकाने नडीकुडा गावाला वेढा घालून शेतशिवार भागातून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond