बोर्डाच्या अक्षम्य चुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; फेरतपासणीत २१ 'नापास' विद्यार्थी झाले 'पास'!
१,१५३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० टक्के मुलांच्या गुणांमध्ये तफावत; विभागीय मंडळाच्या कारभारावर पालकांचा तीव्र संताप लातूर, 19 जून (हिं.स.)। उत्तरपत्रिकेत उत्तरे अचूक लिहूनही आणि उत्तीर्ण होण्याची खात्री असतानाही, बोर्डाच्या ढिसाळ कारभारामुळे नापा
बोर्डाचा गलथान कारभार


१,१५३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० टक्के मुलांच्या गुणांमध्ये तफावत; विभागीय मंडळाच्या कारभारावर पालकांचा तीव्र संताप

लातूर, 19 जून (हिं.स.)।

उत्तरपत्रिकेत उत्तरे अचूक लिहूनही आणि उत्तीर्ण होण्याची खात्री असतानाही, बोर्डाच्या ढिसाळ कारभारामुळे नापास होण्याची नामुष्की ओढवलेल्या २१ विद्यार्थ्यांना अखेर पुनर्मूल्यांकनामुळे (Revaluation) न्याय मिळाला आहे. निकाल पाहून खचून न जाता विद्यार्थ्यांनी केलेल्या पुनरपडताळणीच्या अर्जांमुळे बोर्डाचा मोठा गोबेस्टो समोर आला असून, अनुत्तीर्ण ठरवलेली २१ मुले सन्मानाने उत्तीर्ण झाली आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळांतर्गत (लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हा) फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाले होते. या निकालात अनेक गुणवंत आणि वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांचे गुण अनपेक्षितपणे कमी आले, तर काही विद्यार्थी चक्क नापास झाले. आपला स्वतःवर आणि अभ्यासावर पूर्ण विश्वास असल्याने, विद्यार्थ्यांनी निराश न होता उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केले.

८० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर विभागातील सुमारे १,१५३ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांची फेरतपासणी आणि गुणांकन पडताळणीसाठी बोर्डाकडे रीतसर दाद मागितली होती. या सर्व उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. एकूण अर्जदारांपैकी तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांच्या मूळ गुणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण वाढले असून, काहींच्या गुणांमध्ये घटही झाली आहे.

अखेर लागला अचूक निकाल

बोर्डाच्या परीक्षकांनी केलेल्या तपासणीतील चुका आणि गुण मोजताना झालेल्या तांत्रिक अक्षम्य त्रुटींमुळे ज्या विद्यार्थ्यांना नापास केले गेले होते, ते आता पास झाले आहेत. यामध्ये १२वीच्या १३ आणि १०वीच्या ८ अशा एकूण २१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुनर्मूल्यांकनाचा हा सुधारित निकाल हाती आल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आता या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा देण्याची गरज उरलेली नाही.

अशी झाली प्रक्रियेची अंमलबजावणी

निकालानंतर संशयित वाटणाऱ्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मागवली. ती प्रत आपापल्या कनिष्ठ महाविद्यालय व शाळेतील तज्ज्ञ विषय शिक्षकांकडून तपासून घेतली. शिक्षकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर हा अहवाल मंडळाकडे सोपवण्यात आला. त्यानुसार बोर्डाच्या त्रिसदस्यीय मॉडरेटर्सच्या समितीने उत्तरपत्रिकेची कसून फेरतपासणी केली आणि त्यानंतर गुणांची दुरुस्ती करून अंतिम निकाल जाहीर केला

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande