'मी संसार माझा रेखिते'मध्ये शनायाची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ
मुंबई, 19 जून, (हिं.स.)। ''सन मराठी''वरील ''मी संसार माझा रेखिते'' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अनुप्रियाने दाद्दो बाबांचा खरा
'मी संसार माझा रेखिते'मध्ये शनायाची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ


मुंबई, 19 जून, (हिं.स.)। 'सन मराठी'वरील 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अनुप्रियाने दाद्दो बाबांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणल्यानंतर कथानकाने एक मोठं वळण घेतलं आहे. मात्र, यानंतरही अनुप्रियाच्या आयुष्यातील संकटं संपलेली नाहीत. आता तिच्या संसारात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार असून त्यामुळे अनेक नवी समीकरणं तयार होणार आहेत. या नव्या व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे अनुप्रिया आणि अविनाश यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? त्यांच्या संसारात गैरसमजांची नवी भिंत उभी राहणार का? की हे नवं पात्र त्यांच्या आयुष्यात आणखी काही मोठं वादळ घेऊन येणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या नव्या पात्राचा चेहरा समोर आला असून अभिनेत्री स्वाती लिमये 'शनाया' या महत्त्वाच्या आणि नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे.

या भूमिकेबद्दल अभिनेत्री स्वाती लिमये म्हणाली की, दोन वर्षांनंतर मी पुन्हा छोट्या पडद्यावर काम करत आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी शनायासारख्या वेगळ्या आणि दमदार भूमिकेची वाट पाहत होते. आता ही संधी मला मिळाली आहे, त्यामुळे माझं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. खरं सांगायचं तर, ही भूमिका मिळावी असं मी मॅनिफेस्ट केलं होत आणि ती इच्छा पूर्ण झाली. याआधी मी सन मराठीवरील 'सुंदरी' या मालिकेत काम केलं होतं. आजही अनेक प्रेक्षक मला त्या भूमिकेमुळे ओळखतात आणि भरभरून प्रेम देतात. त्यामुळे पुन्हा एकदा सन मराठीच्या कुटुंबाचा भाग होताना खूप छान वाटत आहे.

यापुढे स्वाती म्हणाली की, 'मी संसार माझा रेखिते' मालिकेत शनायाच्या एन्ट्रीमुळे मोठं वळण येणार आहे. एक धक्कादायक सत्य सर्वांसमोर येणार असून त्यानंतर अनेक नाती आणि परिस्थिती बदलताना दिसतील. पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहे. याआधी बहुतांश सकारात्मक भूमिका केल्या असल्यामुळे आता थोडं दडपण आलं आहे. पण नकारात्मक पात्र साकारताना ती व्यक्ती तसं का वागते, तिच्या मनात काय चाललं असतं, याचा बारकाईने विचार करावा लागतो. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि तितकंच खूप काही शिकवणारी ठरेल.शनायाचा लूकही खूप वेगळा आणि खास आहे. प्रेक्षक मला एका नव्या अंदाजात पाहणार आहेत. अभिनेत्री म्हणून अशा प्रकारचं वेगळं आणि आव्हानात्मक पात्र साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शनायामुळे अनुप्रिया आणि अविनाश यांच्या आयुष्यात नेमकं कोणतं वादळ येणार आहे, हे पाहायला प्रेक्षकांना मज्जा येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande