मी बाबासोबत गावी भजनाला जायचे तिथे गायचे आणि आता ही गाते - प्राप्ती रेडकर
मुंबई, 19 जून (हिं.स.)। ''सावळ्याची जणू सावली'' मालिकेतील सावली हे पात्र प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. आपल्या मधुर आवाजामुळे आणि संघर्षमय प्रवासामुळे सावलीची ओळख अधिक ठळक झाली आहे. संगीत हे या पात्राच्या आयुष्याचा महत्त्वाचा भ
मी बाबासोबत गावी भजनाला जायचे तिथे गायचे आणि आता ही गाते - प्राप्ती रेडकर


मुंबई, 19 जून (हिं.स.)। 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली हे पात्र प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. आपल्या मधुर आवाजामुळे आणि संघर्षमय प्रवासामुळे सावलीची ओळख अधिक ठळक झाली आहे. संगीत हे या पात्राच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असून, त्याच संगीतामुळे तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळताना प्रेक्षक पाहत आहेत. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संगीताशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्राप्ती म्हणाली, माझे बाबा प्रवीण रेडकर गायक आहे ते लाईव्ह शोज करतात, त्यामुळे संगीत आणि गायनाची आवड पहिल्या पासून होती. मी बाबा आणि काका सोबत गावी असताना भजनाला जायचे तेव्हा गायचे आणि आज ही गाते पण अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मी गायनाकडे इतके लक्ष दिलं नाही. पण सावली ही भूमिका साकारताना मी संगीताच्या अजून जवळ गेले आहे. कारण सावलीला जो आवाज दिला आहे तो दिला आहे केतकी माटेगावकरने आणि ती माझी वन ऑफ द आवडती गायिका आहे.

सावलीमुळे मला खूप गोष्टींचं ज्ञान मिळत आहे. मालिकेत एक गाणं आहे 'माझे माहेर पंढरी २.०'. हे गाणं मालिकेत तेव्हा दाखवले आहे जेव्हा सावलीचं सत्य सर्वांसमोर येतं. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला कळतं की जो आवाज ते इतके काळ ऐकत होते तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे. तर जेव्हा आम्ही हे गाणं शूट करत होतो तेव्हा मी खरी रडत होते. प्राप्ती म्हणून मला खूप वाईट वाटत होतं की तिने इतकं सहन केलं आहे आणि आता तिला इतका प्रेम करणारा नवरा भेटला आहे. त्यांनी तिला जी ती डिझर्व करते ती प्रसिद्धी, ओळख आणि कौतुक मिळवण्यात मदत केली आहे. या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणून खूप रडायला येत होतं जेव्हा जेव्हा ते गाणं वाजत होतं. हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे.

प्राप्ती पुढे म्हणाली, तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा. संगीत म्हणजे थेरपी आहे, ते माणसाच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतं. मी जेव्हा खूप आनंदात असते तेव्हा संगीत ऐकते, जेव्हा मी थोडी उदास असते किंवा राग येतो तेव्हाही गाणी ऐकते. प्रत्येक मूडमध्ये मी गाणी ऐकते आणि त्यांच्याशी रिलेट करते. सावलीला असंच प्रेम देत रहा. मालिकेला २ वर्षं झाली आहेत , पण प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच आहे जितकं पहिल्या भागावेळी होतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande