
नवी दिल्ली, 02 जून, (हिं.स.)। केंद्र सरकारने मंगळवारी देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) मधील आपली ६ टक्के हिस्सेदारी विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. या विक्रीसाठी किमान किंमत प्रति शेअर ७१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टाचा भाग म्हणून सुरू केलेल्या या प्रक्रियेअंतर्गत, सरकार कंपनीमधील आपले शेअर्स सवलतीच्या दरात विकत आहे.
एनएचपीसीच्या माहितीनुसार, या विक्रीतून सरकारी तिजोरीत सुमारे ४,2०० कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत १,५४९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) मध्ये सोमवारी एनएचपीसीचा समभाग ७७.१९ रुपयांवर बंद झाला होता. त्याच्या तुलनेत ७१ रुपये प्रति समभाग हा ऑफर फॉर सेल (ओएफएस) दर सुमारे ८ टक्के सवलतीत उपलब्ध आहे. एनएचपीसीचा समभाग मागील बंद भावाच्या तुलनेत २.०७ टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. मात्र, मंगळवारी बाजार सुरू होताच त्यात ५.४८ टक्क्यांची घसरण दिसून आली आणि बाजारभाव घसरून सुमारे ७२ रुपयांपर्यंत पोहोचला.
आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारत सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनएचपीसीमधील आपली ६ टक्के हिस्सेदारी विकत आहे. यापूर्वी सरकारने कोल इंडिया लिमिटेड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांमधील आपली हिस्सेदारी विकली होती. एनएचपीसीमधील समभाग विक्रीतून सुमारे ४,२०० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. हे केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील विनिवेशाच्या व्यापक उद्दिष्टाचा महत्त्वाचा भाग मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule