
मॉस्को, २० जून, (हिं. स) : अमेरिका कतारच्या सहकार्याने इराणला ६ अब्ज डॉलर्सची मालमत्ता मानवतावादी कारणांसाठी वापरण्याची परवानगी देण्याबाबत विचार करत आहे.
'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने सांगितले की, अमेरिका कतारसोबत एका अशा योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे इराणला त्यांच्या गोठवलेल्या (frozen) मालमत्तेपैकी ६ अब्ज डॉलर्सचा निधी मानवतावादी गरजांसाठी वापरता येईल.
वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या उपक्रमाकडे इराणला अमेरिकेसोबत सर्वसमावेशक अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित करणारे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने नमूद केले की, प्रस्तावित व्यवस्थेअंतर्गत सध्या कतारमध्ये ठेवलेला, गोठवलेला निधी अन्न, औषधे आणि इतर मानवतावादी साहित्याच्या खरेदीसाठी वापरला जाईल. सूत्रांनी वृत्तपत्राला सांगितले की, हा दृष्टिकोन भविष्यात इराणच्या इतर गोठवलेल्या मालमत्तेबाबत सवलती देण्यासाठी आधार ठरू शकतो.
अहवालांनुसार, इराणने अद्याप या प्रस्तावाला सहमती दर्शवलेली नाही.
१४ जून रोजी, इराण आणि अमेरिकेने सामंजस्य करारावरील (MoU) काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. १८ जूनच्या रात्री, दोन्ही देशांनी दूरस्थपणे (remotely) या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेला लष्करी संघर्ष संपवण्याच्या व्यवस्थेची रूपरेषा मांडण्यात आली आहे. हा सामंजस्य करार दोन्ही देशांना इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेचे निर्बंध यांबाबत अंतिम करारासाठी वाटाघाटी करण्यास ६० दिवसांचा कालावधी देतो. याव्यतिरिक्त, यात अमेरिकेने नौदल नाकेबंदी उठवणे आणि इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जहाज वाहतूक पुन्हा सुरू करणे यासाठीची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर