
-लोणी टाकळी येथे संतांच्या नावाने स्वतंत्र विकास आराखड्याची मागणी
अमरावती, 24 जून (हिं.स.) | प्रज्ञाचक्षू, ज्ञानेशकन्या म्हणून ओळखले जाणारे संत गुलाबराव महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या लोणी टाकळी येथील संस्थानाला शासनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त आहे. मात्र अपेक्षित विकास झालेला नसल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये नाराजी आहे.
संतांच्या जन्मस्थळावरील मंदिर परिसराचा जीर्णोद्धार, सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा तातडीने मंजूर करण्याची मागणी होत आहे. संतांच्या राहत्या घराचा जीर्णोद्धार करून ‘संत गुलाबराव महाराज विकास आराखडा’ मंजूर करावा, तसेच संतांच्या स्मृती जतन करण्यासाठी सुमारे दहा एकर जागेवर ‘गुलाब वाटिका’ प्रकल्प उभारण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रकल्पात संत साहित्य अभ्यास केंद्र, ध्यानधारणा केंद्र, वाचनालय, उद्यान आणि भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचा मानस आहे. या मागण्यांसाठी विनय देशमुख, दीपक बोबडे, अशोक सवाई यासह आदी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत.
संतांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचले असताना त्यांच्या जन्मभूमीचाही सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने संत गुलाबराव महाराजांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीक्षेत्र लोणी टाकळी चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै २०२६ रोजी संतांच्या जन्मभूमीला भेट देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संत गुलाबराव महाराज साहित्य प्रचार मोहिमेचे प्रमुख माधुर्य ठाकरे यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या चर्चेत संतांचे साहित्य, तत्त्वज्ञान आणि राज्यस्तरीय जयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाल्यास श्रीक्षेत्र लोणी टाकळीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी