
व्यावसायिक कबीर तलवारच्या ठिकाणांचाही समावेश
नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.) : गुजरातच्या मुंद्रा पोर्ट येथील 2021च्या ड्रग्स प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग तपासाच्या अनुषंगाने प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील सुमारे 5 ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत व्यावसायिक हरप्रीत सिंह तलवार उर्फ कबीर तलवार याच्या मालमत्तांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीतील सुमारे पाच ठिकाणांची मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत तपासणी करण्यात आली. या कारवाईत दिल्लीतील व्यावसायिक हरप्रीत सिंह तलवार उर्फ कबीर तलवार तसेच इतर काही संबंधित व्यक्तींच्या परिसरांचा समावेश आहे. दिल्लीतील लोकप्रिय नाईट क्लबचे संचालन करणाऱ्या कबीर तलवारला ऑगस्ट 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक केली होती. गुजरात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर तो नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या अमली पदार्थ जप्तीच्या प्रकरणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकरणात, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून सुमारे 2,988.21 किलो अफगाणी हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास विविध केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असून, आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या पैलूंची चौकशी केली जात आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी