
मुंबई, 24 जून (हिं.स.)। मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बुधवारच्या पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, काम करणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मुंबई शहराच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुंबईत एकूण २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापैकी १९५ मिमी मुंबई पश्चिम उपनगरात आणि १६७ मिमी मुंबई पूर्व उपनगरात पावसाची नोंद झाली. यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, पंपांच्या साहाय्याने गटार साफ करण्याचे काम सुरू आहे. महापौरांनी सांगितले की, सायन, किंग्ज सर्कल, दादर, लालबाग, अंधेरी सबवे आणि सांताक्रूझ सबवे यासह अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे, तर सायनच्या गांधीनगरमधून पाणी काढण्यात आले आहे. महापौरांनी असेही सांगितले की, कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली असून, नजीकच्या भविष्यात त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जातील.
मुसळधार पावसामुळे मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन सेवा, वाशी ट्रान्स हार्बर सेवा, मेट्रो सेवा, बस सेवा आणि रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, बऱ्याच प्रयत्नांनंतर या सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने आज ३.४१ मीटर उंचीच्या भरतीचा, मुसळधार पावसाचा आणि ताशी ८० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर, या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राम मंदिरमध्ये २२४ मिमी, कुलाबा येथे २१८.५ मिमी, सांताक्रूझ येथे २१०.६ मिमी, सायन येथे १८२.५ मिमी, विक्रोळी येथे १८१.७ मिमी, विद्याविहार येथे १८०.७ मिमी आणि चेंबूर येथे १८०.७ मिमी पावसाची नोंद झाली.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून मुंबई आणि पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर आणि किंग सर्कल परिसरात एका उभ्या असलेल्या गाडीवर झाड कोसळून तिचे नुकसान झाले. मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने ते झाड हटवले आहे. त्याचप्रमाणे, विक्रोळी परिसरात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळली, परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वसई-विरारमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नालासोपारा येथील सेंट्रल पार्क, तुळिंज, स्टेशन परिसर, गाला नगर, अचोले रोड, तसेच विरार आणि वसईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पाऊस अजूनही सुरू आहे. पावसाचा जोर असाच वाढल्यास, सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरू शकते.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला असून विविध ठिकाणी नुकसान आणि जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कळवा गावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पावसाचे पाणी थेट गणेशमूर्ती कारखान्यात शिरले आणि मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती भिजल्याने कारखानदाराचे नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरी शहरातील मधला फगारवठार येथे चुकीच्या व अवैध खोदाईमुळे सुमारे 70 ते 80 फूट संरक्षक भिंतीसह रस्ता खचला असून परिसरातील 7 ते 8 घरांना धोका निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट, खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा बळावल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी परिसरातही जोरदार पावसामुळे रस्ते, शेतशिवार आणि सखल भाग जलमय झाले असून परिसरात सर्वत्र पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत आहेत. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी नुकसान आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नेमका हा पाऊस पेरणी करता कसा दिलासादायक ठरतो याकडे देखील बळीराजा लक्ष ठेवून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule