
पटना, 24 जून (हिं.स.) : लोकशाही, संविधान आणि नागरिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीचा संघर्ष हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणिबाणीने आम्हाला शिकवले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी समाजानेजागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. बिहारच्या पाटणा येथील मीठापूर इन्स्टिट्यूशनल परिसरात बुधवारी आयोजित ‘इमरजेंसी चे 50 वर्ष : बिहार आंदोलन आणि आणीबाणी’ या विषयावरील कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात आंबेकर म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना त्या काळातील संघर्ष आणि बलिदानाची ओळख करून देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नव्हता, तरीही आणीबाणीच्या काळात त्यावर बंदी घालण्यात आली. स्वातंत्र्यानंतर काही राजकीय शक्तींनी संघाला आपला प्रतिस्पर्धी मानले होते आणि त्याला संपवण्याची मानसिकता आधीपासूनच होती. त्यांच्या मते संघावरची बंदी ही केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय कारणांमुळे लादण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की जगातील अनेक देशांमध्ये हुकूमशाही अनेक दशकांपर्यंत टिकली, मात्र भारतात समाजाच्या जागरूकतेमुळे आणि लोकशाही जाणीवेच्या बळावर केवळ 19 महिन्यांत आणीबाणी समाप्त झाली. मोठे राजकीय नेते तुरुंगात असतानाही संघाचे सामान्य कार्यकर्ते आणि लोकशाही समर्थक नागरिक संघर्ष करत राहिले. त्यामुळेच लोकशाहीची पुनर्स्थापना शक्य झाली. समाज जागरूक नसता तर भारतही दीर्घकाळ हुकूमशाहीच्या अधीन जाऊ शकला असता, असे त्यांनी सांगितले.
आणिबाणीच्या विरोधात संघाचा संघर्ष सत्ता मिळवण्यासाठी किंवा केवळ संघावरील बंदी उठवण्यासाठी नव्हता, तर संविधान, लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी होता. हा सत्ता परिवर्तनाचा नव्हे, तर लोकशाही व्यवस्था वाचवण्याचा संघर्ष होता. आणीबाणी ही केवळ राजकीय लढाई नसून राष्ट्रीय चारित्र्याची कसोटी होती. भारत हुकूमशाहीच्या दिशेने जाईल की लोकशाही मूल्यांसह पुढे जाईल, हे ठरवण्याचा तो संघर्ष होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संविधानातील मूल्ये ही भारतीय संस्कृतीशी जोडलेली असल्याचे सांगून त्यांनी म्हटले की स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे विचार भारतीय जीवनदर्शनाचाच भाग आहेत. लोकशाहीचे रक्षण केवळ कायद्यांमुळे होत नाही, तर सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक मूल्यांमुळेही होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की लोकशाहीमध्ये लोकजागरण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जागरूक समाजच व्यवस्थेला योग्य दिशा देतो आणि राजकारणाचा स्वरूपही समाजाच्या चरित्रावर अवलंबून असतो.
हिंदुस्थान समाचारच्या भूमिकेबाबत बोलताना आंबेकर म्हणाले की ही वृत्तसंस्था स्थापनेपासूनच भारतीय भाषा आणि राष्ट्रीय दृष्टिकोनाला प्राधान्य देत आली आहे आणि आज 15 हून अधिक भारतीय भाषांमध्ये वृत्तसेवा देत आहे. माहितीच्या वेगाने बदलणाऱ्या युगात सत्य, समाजहित आणि राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवून बातम्या देणाऱ्या संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिलेल्या पंचपरिवर्तनाच्या आवाहनाचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक समरसता, कुटुंबव्यवस्था मजबूत करणे, पर्यावरणपूरक जीवन, कर्तव्यबोध आणि समाजजागरण हे लोकशाही मजबूत करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. भारताची युवा पिढी लोकशाही आणि राष्ट्रनिर्मितीबाबत प्रतिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आणीबाणीच्या काळातही युवांनी लोकशाहीच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि आजही युवांमध्ये देशाला पुढे नेण्याची सकारात्मक ऊर्जा दिसते, असे त्यांनी सांगितले. लोकशाहीचे रक्षण हे केवळ राजकीय पक्षांचे नाही, तर संपूर्ण समाज, कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांचे सामायिक कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जेपी सेनानींचा सन्मान
कार्यक्रमात बिहार आंदोलन आणि आणीबाणीविरोधी संघर्षाशी संबंधित जेपी सेनानींचा सन्मान करण्यात आला. लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या सेनानींचे योगदान स्मरणात ठेवत त्यांना अंगवस्त्र, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थितांनी त्यांचा गौरव करत त्यांच्या संघर्षाला नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले.
बिहार आंदोलन आणि आणीबाणीवर आधारित युगवार्ता आणि नवोत्थान पत्रिकेचे प्रकाशन
कार्यक्रमादरम्यान बिहार आंदोलन आणि आणीबाणीवर आधारित पाक्षिक युगवार्ता आणि मासिक नवोत्थान या पत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले.
या पत्रिकांमध्ये आणीबाणी काळातील घटना, लोकशाही वाचवण्यासाठीचा संघर्ष, बिहार आंदोलनाची भूमिका आणि संबंधित प्रमुख व्यक्तींचे योगदान सविस्तरपणे संकलित करण्यात आले आहे. हे प्रकाशन केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नसून लोकशाही जाणीवेचा महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. नव्या पिढीला आणीबाणीचे अनुभव आणि लोकशाही रक्षणासाठी झालेल्या संघर्षांची ओळख करून देण्यात हे प्रकाशन महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी