
* अमेरिका-रशिया-चीनच्या बलाढ्य नेत्यांना मोदींनी टाकले मागे
* लोवी इन्स्टिट्यूटच्या जागतिक सर्वेक्षणात मोदी अव्वल
* ट्रम्प, पुतिन आणि जिनपिंग यांच्यापेक्षाही मोदींच्या प्रभावी नेतृत्वाची नोंद
मुंबई, 24 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाच्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक पटावर अशी मुसंडी मारली आहे की, आता महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित 'लोवी इन्स्टिट्यूट'च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तब केले असून, जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करत, हा केवळ मोदींचा विजय नसून नव्या भारताच्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार आहे, असे म्हटले आहे.
या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांनाही मोदी यांनी मागे टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन किती बदलला आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदी यांनी राष्ट्र प्रथम या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची ओळख केवळ विकसनशील देश म्हणून राहिलेली नाही, तर जागतिक घडामोडींना दिशा देणाऱ्या प्रभावी शक्ती म्हणून निर्माण झाली आहे. जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भारताची भूमिका आता निर्णायक मानली जात आहे. एकेकाळी महासत्तांच्या निर्णयांचा प्रभाव स्वीकारणारा भारत आज जागतिक शक्ती-संतुलन घडविणाऱ्या देशांच्या पहिल्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे.
'लोवी इन्स्टिट्यूट'च्या अहवालातील आकडेवारीनुसार जागतिक शक्तीच्या समीकरणांमध्ये भारताची झेप लक्षणीय ठरत असून, चीन, अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरी या सर्व क्षेत्रांत भारताने केलेली प्रगती जगाला आश्चर्यचकित करणारी असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. देशाचा सन्मान, स्वाभिमान आणि सामर्थ्य वाढविण्याचे काम मोदी यांनी सातत्याने केले आहे.
आज जग भारताकडे केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर भविष्यातील जागतिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्राच्या नजरेने पाहत आहे. ही बदललेली प्रतिमा आणि वाढलेला प्रभाव मोदी यांच्या अथक परिश्रमांचा व राष्ट्रहिताला दिलेल्या सर्वोच्च प्राधान्याचा परिणाम आहे, असेही शिंदे म्हणाले.
या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, भारताला विश्वगुरूपदाच्या दिशेने नेणाऱ्या या नेतृत्वाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा तिरंगा केवळ देशातच नव्हे तर जागतिक व्यासपीठावरही अधिक उंच फडकत आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मविश्वासाचा आणि नव्या भारताच्या उदयाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी