
पटना, 24 जून (हि.स.) : भारतीय भाषांमधील पत्रकारितेला समर्पित असेलेली हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्था आता देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. हिंदुस्थान समाचार आणि रशियन न्यूज एजन्सी स्पुटनिकचा सहकार्य करार झाला असून देशांतर्गत बातम्यांची देवाण-घेवाण होत असल्याचे प्रतिपादन हिंदुस्थान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर यांनी केले. बिहारच्या पाटणा येथील मीठापूर इन्स्टिट्यूशनल एरियामध्ये बुधवारी आयोजित “इमर्जन्सीची 50 वर्षे : बिहार आंदोलन आणि आणीबाणी” या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी मार्डीकर म्हणाले की, सध्या हिंदुस्थान समाचार 15 भारतीय भाषांमध्ये सेवा पुरवत असून देशभरातील अनेक वृत्तपत्रे, डिजिटल मंच आणि प्रसार भारती या संस्थेच्या सेवा वापरत आहेत. दादासाहेब आपटे यांनी 1948 मध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या मातृभाषेत योग्य आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचाव्यात या उद्देशाने हिंदुस्थान समाचारची स्थापना केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आग्रहावरून मुंबईत याची सुरुवात झाली आणि नंतर त्याला सहकारी संस्थेचे स्वरूप देण्यात आले. बहुभाषिक पत्रकारितेच्या मूलभूत विचारांवर ही संस्था आजही कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचारने नेहमीच सत्य आणि तथ्याला प्राधान्य दिले आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यानही या संस्थेने वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली. भारतीय भाषांतील बातम्या प्रसारणाला गती देण्यासाठी देवनागरी टेलिप्रिंटरसारखी ऐतिहासिक पुढाकार घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मार्डीकर यांनी सांगितले की 1975 च्या आणीबाणीच्या काळात संस्थेवर मोठा सरकारी दबाव होता. तिला कमकुवत करण्याचे आणि बंद करण्याचे प्रयत्न झाले. विविध निर्बंधांमुळे 1983 मध्ये तिचे संचालन स्थगित करावे लागले, मात्र संस्थेचे अस्तित्व संपले नाही.नंतर दिल्ली उच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईनंतर 1998 मधील निर्णयामुळे संस्थेला नवे जीवन मिळाले आणि 2000 मध्ये तिचे पुनरुज्जीवन झाले. पुढील वर्षांत संस्थेचा वेगाने विस्तार झाला.
त्यानंतर 2016 मध्ये आरके सिन्हा यांच्या नेतृत्वाला निर्णायक मानत त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवी ऊर्जा मिळाली आणि तिचे अस्तित्व सुरक्षित राहिले.हिंदुस्थान समाचार आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे. पत्रकारांसाठी मोबाइल ऍप विकसित करण्यात आले असून संपूर्ण न्यूज प्रोसेसिंग सिस्टम क्लाउड-आधारित आहे. एआय, भाषिणी आणि फॅक्ट-चेकिंग तंत्रज्ञानावरही काम सुरू आहे. 2022 मध्ये कार्यालयाला आग लागूनही एक क्षणही सेवा खंडित झाली नाही, असे त्यांनी नमूद केले.
सुमारे 80 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संस्थेने दिल्लीतील पंचकुइयां रोड परिसरात स्वतःचे कायमस्वरूपी कार्यालय खरेदी केले असून 27 जून रोजी तेथे स्थलांतर केले जाणार आहे. अनेक संघर्ष आणि चढ-उतारांनंतरही हिंदुस्थान समाचार आपल्या मूल्यांशी बांधील राहून पुढे जात आहे. संस्था पक्षपाती नसली तरी ती भूमिकाधारक (पक्षधर) असू शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी