
लातूर, 24 जून (हिं.स.)।
राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते आणि समाजातील दुर्लक्षित, मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार व दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूतीचा व सुधारणावादी होता. त्यांनी या घटकांच्या कल्याणार्थ अनेक निर्णय अंमलात आणले. शाहू महाराजांचा हाच आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टिकोनातून त्यांचा जन्मदिवस २६ जून हा प्रतिवर्षी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लातूरमध्येही यानिमित्ताने २६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने २६ जून २०२६ रोजी सकाळी ७.४५ ते ८.४५ या वेळेत राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून, या पायी प्रभातफेरीचा मार्ग राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळा-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक-गंजगोलाई-महात्मा गांधी चौक असा राहील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या प्रभातफेरीचा समारोप करण्यात येईल.
या समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबात जनजागृती करण्याच्या दृष्टीने संविधानातील कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता प्रतिबंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार व कर्तव्ये या विविध अनुच्छेदांची तसेच अस्पृश्यता निर्मूलनाची माहिती घोषणावाक्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तरी २६ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यासाठी, तसेच या समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीत बहुसंख्येने सहभागी होण्यासाठी लातूर येथील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis