
लातूर, 24 जून (हिं.स.)।
उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील औषध वितरण विभागासमोर गेल्या काही दिवसांपासून पाण्याची गळती सुरू असून, त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दररोज शेकडो रुग्ण औषधे घेण्यासाठी या विभागात येत असतात. मात्र गळतीमुळे परिसरात पाणी साचत असल्याने रुग्णांना रांगेत उभे राहणेही कठीण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे घसरून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्काळजी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयात स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना अशा प्रकारची समस्या कायम राहणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, औषध विभागासमोरील पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करून रुग्णांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी रुग्ण व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या शासकीय रुग्णालयातच अशा प्रकारे गैरसोयी निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन समस्या सोडविणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis