सेन्सेक्स ७९० अंकांनी तर निफ्टी १९७ अंकांनी वधारून झाला बंद
मुंबई, 24 जून (हिं.स.)। मुंबई शेअर बाजार (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी) बुधवारी उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या एका प्रस्तावामुळे धक्का बसल्यानंतर जा
Stock market opens in green, Sensex jumps 239.47 points


मुंबई, 24 जून (हिं.स.)। मुंबई शेअर बाजार (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी) बुधवारी उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या एका प्रस्तावामुळे धक्का बसल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. इराणवर नव्याने लष्करी कारवाई करणे ट्रम्प यांच्यासाठी अधिक कठीण झाल्याने आशियातील बहुतांश बाजारांमध्ये खरेदीचा जोर वाढला आणि त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.

दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक सुरुवातीला घसरणीत गेला होता. तो ७६,२२९.७६ अंकांवर उघडल्यानंतर ७६,१२१.५९ अंकांपर्यंत खाली आला. मात्र त्यानंतर खरेदीचा जोर वाढत गेला आणि सेन्सेक्सने दिवसभरात तळाच्या पातळीपासून तब्बल १,०६८ अंकांहून अधिक उसळी घेतली. अखेरीस सेन्सेक्स ७९०.५४ अंकांच्या म्हणजेच १.०४ टक्के वाढीसह ७६,९९१.२२ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही सुरुवातीला दबावाखाली होता. तो २३,७९५.८० अंकांवर उघडून २३,७८९.२५ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे निर्देशांकाने वेग घेतला. दिवसाच्या उच्चांकी टप्प्यावर तो २४,०९०.०५ अंकांपर्यंत पोहोचला. शेवटी निफ्टी १९७.५५ अंकांच्या म्हणजेच ०.८३ टक्के वाढीसह २४,०२१.६५ अंकांवर स्थिरावला.

तेल आणि वायू, माहिती तंत्रज्ञान तसेच खासगी बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. आरोग्य सेवा, ग्राहक टिकाऊ वस्तू, दैनंदिन उपभोग्य वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनीही चांगली कामगिरी केली. दुसरीकडे भांडवली वस्तू, वाहननिर्मिती, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि धातू क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिला.

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे १.८७ लाख कोटी रुपयांची भर पडली. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४७६.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहारदिनी ते ४७४.५९ लाख कोटी रुपये होते.

दिवसभरातील व्यवहारात इंटरग्लोब एव्हिएशन, अदानी एंटरप्रायझेस, ट्रेंट, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स या समभागांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. तर बजाज ऑटो, एनटीपीसी, ओएनजीसी, टाटा स्टील आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. एकूणच जागतिक सकारात्मक संकेत आणि मजबूत खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने दमदार पुनरागमन करत दिवसाची सांगता भक्कम वाढीसह केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande