बोगस डॉक्टरांवर कारवाई करा; आ. डॉ. राहुल पाटील यांची विधानसभेत मागणी
परभणी, 24 जून, (हिं.स.)। परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात वाढत्या बोगस डॉक्टरांच्या समस्येचा मुद्दा परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र
आमदार डॉ. राहुल पाटील यांची विधानसभेत मागणी


परभणी, 24 जून, (हिं.स.)। परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात वाढत्या बोगस डॉक्टरांच्या समस्येचा मुद्दा परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवश्यक ती कारवाई करण्याबरोबरच तपासणी समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्याचे आश्वासन दिले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी हा प्रश्न उपस्थित करताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून अनेकजण कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. अशा व्यक्तींकडून रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जात असून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः काही तथाकथित बंगाली डॉक्टरांकडून विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय केला जात असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर समित्या अस्तित्वात असल्या तरी त्यांच्याकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समित्यांकडून नियमित तपासणी होत नसल्याने बोगस डॉक्टरांवर नियंत्रण येत नसल्याचे सांगत या समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी शासनाकडे केली. तसेच संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, नोंदणी व वैद्यकीय परवान्यांची पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यास उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी तपासणी समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यात येईल तसेच नव्याने समित्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले. बोगस डॉक्टरांची ओळख पटविण्यासाठी नवीन यंत्रणा आणि तांत्रिक प्रणाली विकसित करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, नागरिकांनीही बोगस डॉक्टरांविषयीच्या तक्रारी प्रशासनाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे मराठवाड्यातील बोगस डॉक्टरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाकडून याबाबत प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande