तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप
मुंबई, 24 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळ, गुटखा आणि औषध क्षेत्रातील गैरप्रकारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे हे खाते देशभरात चर्चेत आले आहे. मात्र, त्यांच्या या धडक कारवा
Tukaram Mundhe Transfer Allegation 250 Crore Collected Claims Jitendra Awhad


मुंबई, 24 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळ, गुटखा आणि औषध क्षेत्रातील गैरप्रकारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे हे खाते देशभरात चर्चेत आले आहे. मात्र, त्यांच्या या धडक कारवाईमुळे विविध हितसंबंधी गट अस्वस्थ झाले असून त्यांच्या बदलीसाठी तब्बल २५० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला.

विधानसभेत बोलताना आव्हाड यांनी दावा केला की, औषध उद्योगातील काही शक्तिशाली गट, अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही कंपन्या एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. त्यांच्या बदलीसाठी मोठी सुपारी देण्यात आली असून यासाठी २५० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील आठवड्यात संबंधित व्यक्ती आणि संस्थांची नावेही जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भेसळीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आव्हाड यांनी अन्न व औषध प्रशासन विभागातील यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासणीसाठी पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा अद्ययावत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक प्रकरणांमध्ये नमुने प्रयोगशाळेत गेल्यानंतर नापास होतात, मात्र नंतर तडजोडी करून प्रकरणे मिटवली जातात, असेही ते म्हणाले.

पालघर किनारपट्टीवर गुटखा उतरल्यावर तो संपूर्ण महाराष्ट्रात कसा पोहोचतो, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विभागातील काही अधिकारी आणि त्यांच्या जाळ्यावरही संशय व्यक्त केला. अन्न व औषध प्रशासन विभाग प्रत्यक्षात मंत्री नरहरी झिरवाळ चालवत नसून त्यामागे दुसरीच ताकद कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. विभागातील अधिकाऱ्यांकडे वाहने, कार्यालये आणि मूलभूत सुविधा नसल्याची कबुली देत त्या सुविधांची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना किमान तीन वर्षे या पदावर कायम ठेवण्याची मागणी केली. तर आमदार अर्जुन खोतकर यांनी मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी सभागृहात केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande