
मुंबई, 24 जून, (हिं.स.)। यशराज फिल्म्सचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'अल्फा'बद्दल अभिनेत्री आलिया भट्ट अत्यंत उत्साहित आहे. आलिया या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे वर्णन तिच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभवांपैकी एक म्हणून करते. भारतातील पहिल्या मोठ्या बजेटच्या आणि महिला-प्रधान ॲक्शन चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अल्फा'मध्ये आलियासोबत शर्वरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीच्या मते, हा चित्रपट केवळ ॲक्शनपुरता मर्यादित नसून तो एका विशिष्ट मानसिकतेचा आणि दृष्टिकोनाचा गौरव करतो.
'अल्फा'च्या विश्वात पाऊल टाकणे अत्यंत रोमांचक होते, असे आलियाने नमूद केले. तिने सांगितले की, या चित्रपटामुळे तिला एक कलाकार म्हणून नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची संधी मिळाली. आलिया म्हणाली, मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटाची कथा दोन महिलांभोवती फिरते, ज्या संपूर्ण ॲक्शन कथानकाला पुढे नेतात. असे दृश्य पाहायला मिळणे दुर्मिळ आहे आणि त्याचा भाग असणे माझ्यासाठी खरोखरच विशेष होते. तिने पुढे सांगितले की, हा चित्रपट भव्यता, उत्साह आणि दमदार ॲक्शन दृश्यांनी परिपूर्ण असा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो.
अभिनेत्रीने चित्रपटाच्या टीमचेही कौतुक केले. तिने सांगितले की, दिग्दर्शक शिव रवैल, कलाकार, ॲक्शन टीम आणि संपूर्ण क्रू यांचा उत्साह दररोज सेटवर स्पष्टपणे जाणवत होता. म्हणूनच चित्रीकरणाच्या प्रत्येक दिवशी ती उत्साहाने सेटवर येत असे. आदित्य चोप्रा यांची निर्मिती आणि 'द रेल्वे मेन'साठी ओळखल्या जाणाऱ्या शिव रवैल यांचे दिग्दर्शन असलेला 'अल्फा' हा चित्रपट ३ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर