
मुंबई, 24 जून, (हिं.स.)। अत्यंत बहुप्रतिक्षित चित्रपट 'मिर्झापूर: द मूव्ही'चा टीझर प्रदर्शित होण्याच्या अवघ्या एका दिवस आधी, निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर जारी केले आहे. हे पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर त्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रिय वेब सिरीज 'मिर्झापूर'चा वारसा पुढे नेणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता आहे आणि टीझरच्या घोषणेमुळे ही उत्सुकता अधिकच वाढली आहे.
प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या मध्यभागी मिर्झापूरची ती प्रसिद्ध 'गादी' (सिंहासन) दिसत असून, तिच्या दोन्ही बाजूंना बंदुका आहेत. हे दृश्य सत्तासंघर्ष, शत्रुत्व आणि संघर्षाचे तेच जग पुन्हा अधोरेखित करते, ज्याने 'मिर्झापूर'ला देशातील सर्वात लोकप्रिय क्राईम फ्रँचायझींपैकी एक म्हणून ओळख मिळवून दिली. जरी या पोस्टरमधून कथानकाचा तपशील उघड झाला नसला, तरी मिर्झापूरचे हे जग आता अधिक भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळतात.
ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज (Amazon MGM Studios) आणि एक्सेल एंटरटेनमेंट (Excel Entertainment) द्वारे सादर केल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे, तर याची कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सह-निर्माते आहेत. 'मिर्झापूर: द मूव्ही' ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर याचा पहिला टीझर उद्या प्रदर्शित केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर