
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । जिल्ह्यात आपत्तीच्या दृष्टीने ११८ धोक्याची ठिकाणे शोधण्यात आली असून, त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. श्री. जिंदल यांनी जिल्ह्यातील सद्यःस्थितीची माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र पुढील आठवडाभरात पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्तीची समस्या उद्भवल्यास संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्णपणे सतर्क राहावे, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिली.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, तसेच सर्व तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी