शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ
मुंबई, 25 जून (हिं.स.) : राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भर
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ


मुंबई, 25 जून (हिं.स.) : राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिली.

माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शहीद कुटुंबांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, आता महसूल खात्याची जमीन वीर माता किंवा पत्नीच्या नावे करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

माथेरानला ५ एकर पार्किंग आणि क्रीडा संकुलाला निधी

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णयांची माहिती देताना बावनकुळे यांनी सांगितले की, प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान येथे पर्यटकांसाठी पार्किंगची मोठी समस्या होती. यासाठी माथेरान नगरपालिकेच्या मागणीनुसार महसूल विभागाची ५ एकर जागा पार्किंगसाठी मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील 'गादा' येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठाणे जमीन गैरव्यवहार

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आदिवासी जमीन प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून ३ प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. यात नियमांनुसार झालेली प्रक्रिया, सुनावणीची संधी आणि तांत्रिक त्रुटी तपासल्या जात असून सरकार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

'ऑपरेशन टायगर'शी भाजपचा संबंध नाही

शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन टायगर'शी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. आपला पक्ष कसा चालवायचा किंवा वाढवायचा हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande