रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ नोंदवली जात आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील कोणतीही नदी इशारा अथवा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. खेड त
रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ


रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ नोंदवली जात आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील कोणतीही नदी इशारा अथवा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही.

खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात ७.२३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा असून धरण २६.५५ टक्के भरले आहे. येथे १७८ मिमी पावसाची नोंद झाली असून सांडव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही.

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ४८.३१५ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून धरण ५८.२८ टक्के भरले आहे. येथे ३०६ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या सांडव्यातून विसर्ग करण्यात आलेला नाही.

राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पात ३१.७९५ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून धरण ४३.८२ टक्के भरले आहे. या परिसरात ३१० मिमी पावसाची नोंद झाली असून सांडव्यातून कोणताही विसर्ग नाही.

लांजा तालुक्यातील मुचकुंदी प्रकल्पात ६.९९६ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून धरण ३०.४३ टक्के भरले आहे. येथे २१५ मिमी पाऊस झाला असून सांडव्यातून विसर्ग नसला तरी सिंचन वाहिनीतून ०.०५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी ३.५० मीटर असून इशारा पातळी ५.०० मीटर व धोका पातळी ७.०० मीटर आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीची पातळी १.५० मीटर असून तीही इशारा पातळीपेक्षा खूपच खाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीची पातळी ०.६० मीटर, तर सोनवी नदीची पातळी ०.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. तसेच बावनदीची पातळी १.२३ मीटर असून या तिन्ही नद्या इशारा पातळीपासून सुरक्षित अंतरावर आहेत.

लांजा तालुक्यातील काजळी नदीची पातळी ११.३० मीटर इतकी असून इशारा पातळी १६.५० मीटर व धोका पातळी १८.०० मीटर आहे. मुचकुंदी नदीची पातळी ०.२५ मीटर असून इशारा पातळी ३.५० मीटर आहे.

राजापूर येथील कोदवली नदीची पातळी ०.५० मीटर नोंदविण्यात आली असून तिची इशारा पातळी ३.९० मीटर आणि धोका पातळी ८.१३ मीटर आहे.

जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसाचा सकारात्मक परिणाम धरणसाठ्यावर दिसून येत असून गडनदी प्रकल्पाने ५८.२८ टक्के साठा गाठला आहे. अर्जुना आणि मुचकुंदी प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande