
* गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई, 25 जून (हिं.स.) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेली अभद्र भाषा, अश्लील शिवीगाळ आणि महिला लोकप्रतिनिधींचा जाहीर अपमान याविरोधात खासदार डॉ. ज्योती सावित्री नग्नाथ वाघमारे यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांच्या गेल्या चार वर्षांतील वादग्रस्त विधानांची आणि वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी खासदार वाघमारे यांनी नवी दिल्ली येथील महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयाला पाठवलेल्या ईमेल तक्रारीत केली आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरु; निवेदनात घणाघात
राष्ट्रीय महिला आयोगाच्या माननीय अध्यक्षांना पाठवलेल्या या अधिकृत ईमेलमध्ये खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांच्या जाहीर विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि वैचारिक राजकारणाची मोठी परंपरा आहे, मात्र खासदार राऊत यांच्या अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे या परंपरेला मोठी ठेस पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे आणि आरोप:
महिला लोकप्रतिनिधींचा अश्लील उल्लेख: राजकीय द्वेषापोटी संजय राऊत यांनी मर्यादा ओलांडली असून, शिवसेना पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींबद्दल 'वेश्या' सारख्या अत्यंत अश्लील, आक्षेपार्ह आणि अक्षम्य शब्दांचा वापर केला होता. तसेच एका महिला कार्यकर्त्याला फोनवर दिलेल्या अश्लील शिवीगाळ व धमक्यांची ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली आहे.
हिंसक आणि घृणास्पद वर्तन: पत्रकार परिषदांमध्ये कॅमेऱ्यांसमोर थेट प्रक्षेपणात थुंकणे, विरोधकांचा 'रेडे' म्हणून उल्लेख करणे आणि त्यांच्या लाशाच येतील, त्यांना थेट पोस्टमॉर्टमसाठी पाठवू अशी जाहीर हिंसक भाषा वापरून राऊत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर: कोणतीही भाषा वापरा, कुणाचाही अपमान करा, आमचे कोणी काही बिगाडू शकत नाही अशा भ्रमात वावरत संजय राऊत स्वतःला कायद्याच्या वर समजू लागले आहेत. लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे शिवीगाळ करण्याचा परवाना नव्हे, असा टोला खासदार वाघमारे यांनी लगावला.
तत्काळ फौजदारी कारवाईची मागणी
खासदार संजय राऊत यांच्या या मानसिक आणि शाब्दिक छळामुळे महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते, अशी भीतीही खासदार वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे स्वतःहून दखल घ्यावी आणि संजय राऊत यांच्यावर योग्य कलमांखाली तत्काळ गुन्हा दाखल करून कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी