कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही – उद्धव ठाकरे
नागपूर, 26 जून (हिं.स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे आणि त्यांच्यामुळेच कायम राहणार आहे. कुणाच्या कितीही पिढ्या उ
उद्धव ठाकरे


नागपूर, 26 जून (हिं.स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे आणि त्यांच्यामुळेच कायम राहणार आहे. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. जे शिवसेनेच्या मुळावर उठतील, त्यांना संपवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर विदर्भातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतमाळ दौऱ्यासाठी रवाना होताना त्यांनी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी नागपुरात लवकरच भव्य शिवसैनिक मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. आज मी यवतमाळला जात आहे; मात्र लवकरच पुन्हा नागपुरात येणार आहे. पुढील महिन्यात नागपुरात शिवसैनिकांचा भव्य मेळावा घेऊ, असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

सरकारवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आपण ऐतिहासिक सभा घेतली होती. त्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता सरकारने नागपुरात तेवढे मोठे मैदान शिल्लक ठेवले असेल, तर त्याच मैदानावर पुन्हा जाहीर सभा घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande