
रायगड, 26 जून (हिं.स.) : महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस इन्स्पेक्टर असल्याची खोटी बतावणी करून एका महिलेची तब्बल 7 लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च ते 28 मे 2026 या कालावधीत मौजे फेड बँक, नवेनगर, महाड येथे ही घटना घडली. आरोपी हा न्यू पनवेल येथील अश्वमेध अपार्टमेंट, सेक्टर-8, खांदा कॉलनी येथे राहणारा असून, त्याने स्वतः व त्याची पत्नी मंत्रालय, मुंबई येथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असल्याची खोटी माहिती फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला दिली. त्यामुळे त्यांच्यात विश्वासाचे संबंध निर्माण झाले.
त्यानंतर फिर्यादीच्या मैत्रिणीची जुन्या भारतीय चलनाच्या बदल्यात अधिक पैसे मिळवून देण्याच्या व्यवहारात झालेली आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. त्यासाठी 7 मार्च 2026 रोजी फिर्यादीकडून 60 हजार रुपये रोख घेतले.
यानंतर 27 व 28 मे 2026 रोजी फिर्यादीच्या मालकीची दोन सोन्याची मंगळसूत्रे (काळ्या मण्यांसह) फेड बँकेत स्वतःच्या नावाने तारण ठेवून त्यावर 6 लाख 44 हजार 300 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही संपूर्ण रक्कम आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 85/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(2), 318(4), 319(2) आणि 316(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)