
बीड, 26 जून (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील प्रशासकीय लाचखोरीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यातच १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस अंमलदाराला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या प्रकरणाशी संबंधित एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत नोटीस तामिल करून देण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने गुरुवारी बीड शहर पोलीस ठाणे परिसरात गोपनीयरीत्या सापळा रचला. यावेळी संबंधित पोलीस अंमलदार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला.
या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई जालना एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात वारंवार बाहेरील जिल्ह्यांच्या एसीबी पथकांकडून होत असलेल्या कारवायांमुळे स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धती आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भ्रष्टाचाराविरोधात अधिक कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis