
नागपूर, 04 जून (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानंतर आपल्या कार्यप्रणाली आणि संघटनात्मक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असून, त्याची झलक यंदाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग – द्वितीय मध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे. संघटन विस्ताराच्या आगामी आराखड्याच्या अनुषंगाने प्रचारकांच्या संख्येत वाढ करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
संघाच्या अधिकृत माहितीनुसार, यंदा नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता विकास वर्गात देशभरातून निवडलेल्या ८८० शिक्षार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी तब्बल २३५ जण प्रचारक श्रेणीतील असून, एकूण प्रशिक्षणार्थ्यांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण सुमारे २६ टक्के आहे. संघाच्या दृष्टीने प्रचारक हे संघटन उभारणी, शाखाविस्तार, सामाजिक उपक्रम आणि नेतृत्व विकास यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. त्यामुळे त्यांची वाढती संख्या संघाच्या भावी धोरणांची दिशा दर्शविणारी मानली जात आहे.
गेल्या ११ मे रोजी प्रारंभ झालेल्या या वर्गात स्वयंसेवकांना दैनंदिन शाखा संचालन, सामाजिक कार्य, संघटन विस्तार आणि नेतृत्व कौशल्ये यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. सहभागींच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार करता, ५८३ स्वयंसेवक विविध व्यवसायांशी संबंधित आहेत, तर ६२ जण विद्यार्थी असून त्यामध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थांतील (IIT) विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पाहता, ४१३ जण पदवीधर तर ३३२ जण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत. याशिवाय दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले ३१, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले ६३ आणि इतर शैक्षणिक श्रेणीतील ४१ कार्यकर्ते या वर्गात सहभागी झाले आहेत.
संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानंतर पुढील वर्षापासून संघटनेच्या प्रशासकीय रचनेतही बदल प्रस्तावित आहेत. विद्यमान ‘प्रांत’ व्यवस्थेऐवजी ‘संभाग’ (विभाग) आधारित रचना अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे. या बदलांमुळे संघटनात्मक गरजा वाढणार असून प्रचारकांची संख्या वाढविण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे.याशिवाय, आगामी काळात संघाच्या कार्यपद्धतीतही परिवर्तन घडवून आणले जाणार आहे. समाजजागरण, व्यापक संपर्क आणि प्रभावी प्रचार यांवर विशेष भर देत कुटुंबव्यवस्था आणि युवा पिढीशी अधिक दृढ संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावित बदलांचे प्रतिबिंब यंदाच्या कार्यकर्ता विकास वर्गात स्पष्टपणे उमटल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
एकूणच, शताब्दी वर्षानंतरच्या नव्या पर्वासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची संघटनात्मक आणि कार्यात्मक पुनर्रचना करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. प्रचारकांची वाढती संख्या आणि प्रशिक्षणावर दिला जाणारा भर हा संघाच्या भावी विस्तार आराखड्याचा महत्त्वपूर्ण भाग ठरणार असल्याचे मानले जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी