
नवी दिल्ली, 04 जून (हिं.स.)केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासमवेत येथे भारतातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूएल कारचे अनावरण केले. हा उपक्रम मारुती सुझुकीने हाती घेतला आहे.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमुळे उत्सर्जन कमी होईल, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि अंदाजे १.४४ लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल. ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ, शाश्वत आणि आत्मनिर्भर गतिशीलतेच्या संकल्पनेनुसार आहे.
ते म्हणाले की, या उपक्रमामुळे जैवइंधनाला प्रोत्साहन मिळेल, शेतकऱ्यांना पाठिंबा मिळेल, ग्रामीण ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. वाहतूक क्षेत्रामुळे अंदाजे ४० टक्के प्रदूषण होते आणि ते कमी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. दिल्लीसारख्या शहरांतील लोकांना वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांची चांगलीच जाणीव आहे आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, हरदीप सिंग पुरी यांच्या विशेष पुढाकाराने आणि मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या पाठिंब्याने भारताने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
जाणून घ्या यात काय खास आहे?
मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक, वॅगनआर, या नवीन आणि प्रगत अवतारात सादर केली आहे. चला, याची वैशिष्ट्ये आणि कार्यप्रणाली पाहूया:
फ्लेक्स-फ्यूएल इंजिन (ICE): या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे अंतर्गत ज्वलन इंजिन (internal combustion engine). हे इंजिन सामान्य पेट्रोल आणि E85 (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोलचे मिश्रण) या दोन्हीवर पूर्ण क्षमतेने चालू शकते.
मजबूत आणि अद्ययावत भाग: इथेनॉलचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी कारची इंधन प्रणाली, इंजिनचे घटक आणि इलेक्ट्रॉनिक्स विशेषतः अद्ययावत (अपग्रेड) करण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचे आयुष्य आणि कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.
उत्कृष्ट कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा: ही कार केवळ कार्बन उत्सर्जन (प्रदूषण) लक्षणीयरीत्या कमी करणार नाही, तर ग्राहकांसाठी पेट्रोलपेक्षा अधिक किफायतशीर देखील ठरेल.
फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञान म्हणजे काय?
फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमध्ये अंतर्गत ज्वलन इंजिने बसवलेली असतात, जी पेट्रोलसोबत इथेनॉल किंवा मिथेनॉलच्या इंधन मिश्रणावर चालू शकतात. हे तंत्रज्ञान पारंपरिक इंधनांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक मानले जाते आणि आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे