एचएसआरपी आगाऊ नोंदणी केलेल्यांना दिलासा
रायगड, 01 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणे आणि वाहनांचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित व नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण
Action against vehicles without HSRP starts today; relief for those who have registered in advance.


रायगड, 01 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणे आणि वाहनांचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित व नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, १ जुलै २०२६ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी आगाऊ नोंदणी (अपॉइंटमेंट) केलेल्या वाहनधारकांना या कारवाईतून दिलासा देण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांची अचूक ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखणे तसेच वाहनांशी संबंधित गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी HSRP प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित सर्व वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून HSRP बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

परिवहन विभागाने या कामासाठी अधिकृत कंपन्यांची नियुक्ती केली असून, अनधिकृत विक्रेत्यांकडून बसविण्यात आलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नसल्याने अशा प्लेट वैध मानल्या जाणार नाहीत. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ अधिकृत यंत्रणेमार्फतच HSRP बसवून घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस किंवा ट्रक मालकांनी सामूहिक अर्ज केल्यास संबंधित एजन्सीकडून त्यांच्या परिसरात किंवा गृहनिर्माण संस्थेत कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता HSRP बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

HSRP नसलेल्या वाहनांबाबत परिवहन कार्यालयातील विविध सेवा यापूर्वीच मर्यादित करण्यात आल्या असून, आता केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. HSRP संदर्भातील अधिक माहितीसाठी वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande