
- बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
- प्रथमदर्शनी निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन
- संबंधित कंत्राटदारावरही महानगरपालिका करणार कठोर कारवाई
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) -
चेंबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महागनरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) श्री. शशांक भोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी दिले आहेत. यासोबतच समितीने या प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच अशा घडना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रथमदर्शनी निष्काळजीपणा ज्यांच्याकडून झाल्याचे निदर्शनास आले अशा संबंधित अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबीत करण्यात येत आहे. यासह संबंधित कंत्राटदाराविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
चेंबूर पश्चिम येथील हरीताज प्रीतम इमारत, रोड नं. ११, डायमंड गार्डन जवळून 'युनिव्हर्सल हायस्कूल’ची बस दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रस्त्यावरुन जात असताना पिंपळ वृक्ष मुळासकट उन्मळून बसवर कोसळला. सदर बसमध्ये एकूण १३ मुले अडकली होती. त्यापैकी १२ मुलांना तात्काळ मुंबई अग्निशमन दल, बसवाहक, स्थानिक नागरीकांमार्फत सुटका करुन नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले. ५ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी किरकोळ जखमी होते. तर कु. विहान श्रीवास्तव (वय ११) हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेची गंभीर दखल महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी घेतली आहे.
तसेच सदर घटनेच्या सखोल चौकशीसाठी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीने आपला अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नेमण्यात आलेल्या समितीने या प्रकरणात तज्ञांराचा सल्ला घ्यावा. तसेच मुंबईमध्ये अशा घडना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबीत करण्यात येत आहे. यासह संबंधित कंत्राटदाराविरोधातही महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
उन्मळून पडलेला पिंपळ वृक्ष ६० ते ७० वर्ष जुना होता. संबंधित वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त आलेली नव्हती. तथापी, जानेवारी २०२६ मध्ये परिसरातील रस्त्याच्या कडेला कामांच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी दिल्या होत्या. तत्पूर्वी पडलेल्या वृक्षाचे सर्वेक्षण दिनांक १२ मे २०२६ रोजी पूर्ण करण्यात आले होते. बाह्य निरीक्षणानुसार सदर वृक्ष सुस्थितीत व मजबूत असल्याचे निदर्शनास आले होते. तथापि, पावसाळयापूर्वी प्रचलित पध्दतीनुसार दिनांक २९ मे २०२६ रोजी या वृक्षाची छाटणी देखील करण्यात आली होती. त्यावेळी झाड सुरक्षित अवस्थेत असल्याचे आढळले.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून खबरदारी घेत दरवर्षी वृक्ष छाटणी करण्यात येते. सन २०२६ मध्ये अशाप्रकारे ४६८ झाडे ही मृत आणि धोकादायक आढळून आली. ही सर्व झाडे काढून टाकण्यात आली. यासोबत १ लाख ३१८ झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. याशिवाय विविध कारणांनी देखील महानगरपालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडतात.
सन २०२३ मध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रात १८० आणि खासगी क्षेत्रात ५०७ असे एकूण ६८७ वृक्ष उन्मळून पडले होते. तर, सन २०२४ मध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रात १७१ आणि खासगी क्षेत्रात ४८२ असे एकूण ६५३ वृक्ष उन्मळून पडले होते. तर सन २०२५ मध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रात २२१ आणि खासगी क्षेत्रात ६३४ असे एकूण ८५५ वृक्ष उन्मळून पडले होते.
यापुढे चेंबूर दुर्घटनेसारखी घटना घडू नये यासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी धोकादायक झाडांची नव्याने छाटणी आणि कालबद्ध पुनर्परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या छाटनीबाबत तसेच सुस्थितीतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी