
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दानपेटी अपहारप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मंदिर व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, या मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परभणी यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम मंदिर हे देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून तेथील देणगीच्या कथित अपहाराच्या घटनेमुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणातील दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, अपहारातून उभारण्यात आलेली कथित संपत्ती जप्त करण्याची आणि संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, अयोध्या येथील मंदिर व्यवस्थापन अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्या व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करून त्यातील योग्य बाबींचा अवलंब करावा, अशी सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे. देणगी मोजणी, लेखापरीक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
हे निवेदन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात यावे, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परभणी यांच्या वतीने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis