
परभणी, 01 जुलै, (हिं.स.) - स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026 मोहिमेला गती देत परभणी महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 15 मधील विष्णूनगर कॉर्नर परिसरातील दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेली मोठी कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करून त्या जागेचे वृक्षारोपण व सुशोभीकरण केले.
महापौर सय्यद इक्बाल, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त तुकाराम कदम, सहायक आयुक्त गजानन जाधव तसेच नगरसेवक केदार खटिंग, विजय भालेराव, अद्वैत सागळे आणि जिजा थोरात यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्रीकांत कुर्हे, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने आणि जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचार्यांनी कचराकुंडी हटवून परिसराची सखोल स्वच्छता केली. त्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसराला हिरवाईची नवी ओळख देण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, डॉ. भगवान कोरडे, डॉ. कड, अक्षय संघई, कदम, जेठुरे, डुब्बेवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विष्णूनगर परिसरातील दीर्घकाळापासूनची कचराकुंडी हटविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महानगरपालिकेने उचललेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये परभणी शहराने उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, कचरा योग्य ठिकाणीच टाकावा आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच स्वच्छ करण्यात आलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis