
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । मसालेपीक लागवडीची माहिती देऊन आणि काळीमिरीची प्रत्यक्ष लागवड करून कसोपमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला.
कसोप गावामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत दापोलीच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील रावेच्या विद्यार्थ्यांनी मसालेपीक लागवडीसंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन कसोप येथील ग्रामोन्नती मंडळ इमारतीत केले होते. भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. के. व्ही. मालशे आणि डॉ. संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले. यादरम्यान विद्यार्थ्यांनी काळी मिरी,जायफळ, दालचिनी, हळद आणि लाखीबाग प्रकल्प या विषयांवर पूर्ण लागवडीची माहिती आणि मसालेपिकांचे महत्त्व तसेच मसालेपिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, नारळ बागेमध्ये मसालेपिके आंतरपीक म्हणून कसे लागवड करू शकतो, याबद्दल मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याने कसोप गावातील शेतकऱ्यांना केले.यादरम्यान गोकृपा अमृतमचे कल्चरदेखील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना वाटण्यात आले. शेवटी काळीमिरी रोपांची लागवड उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमाला कसोप गावातील ग्रामपंचात सदस्य रेणुका आग्रे, साक्षी चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र साळवी, ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष राहुल साळवी आणि तसेच आजच्या दिवसाचा महत्त्वाचा भाग म्हणजेच शेतकरी, ग्रामस्थ आणि रावेचे ११ विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी