
ठाणे, 01 जुलै (हिं.स.)। पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरुन पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.
या पाहणी दौ-यास शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मृणाल पेंडसे, उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, दीपक झिंजाड, सहायक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, गुणवंत झांबरे, स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. पेढ्या मारूती परिसर, महाजनवाडी हा सखल भाग असल्याने या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचते, पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी पंप बसविण्यात आले असून क्रॉस कलव्हर्टची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या.
वंदना एस.टी डेपो हा परिसर पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचते या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी कार्यरत असलेला पंप बंद पडल्याने तात्काळ नवीन पंप बसविण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क रहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. गुरूद्वारा परिसरात मेट्रोचे काम सुरू असून त्या ठिकाणी खणण्यात आलेल्या खड्डयात पाणी साचल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी तात्काळ सदर ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना सूचना संबंधित प्राधिकरणांनी कराव्यात असे निर्देश दिले.
ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून मनुष्यबळ देखील त्या त्या भागात उपलब्ध करण्यात आले आहे. हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा लक्षात घेवून त्याप्रमाणे सखल भागात पंपाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनास दिल्या.
पावसाला सुरूवात होण्यापूर्वी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला होता. या बैठकीत सखल भागात पाणी साचणारी ठिकाणे, नाले सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता,मशिनहोल आदीबाबत सखोल चर्चा करुन सदर ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.प्रशासनाने पेढया मारुती परिसरात जनरेटरसहित 10 व 15 एचपी (horsepower)पंप, मासुंदा तलाव येथे 15एच पीचे दोन सबमर्सिबल पंप, भांजेवाडी परिसरात 10 एच पी व 5 एचपी चे 3 पंप तसेच वंदना परिसरातही 32 एचपी व 25 एचपीचे पंप बसविले आहे. मान्सून काळात प्रशासनाने सतर्क रहावे व नागरिकांची गैरसोय होणार नाही त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना नमूद केले.
*आपत्कालीन कक्षाचा घेतला आढावा*
ठाणे महानगरपालिका मुख्यालयात आपत्कालीन कक्ष 24x7 कार्यरत असून या कक्षाचा आढावा देखील आज पुन्हा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. यावेळी नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक कॉलवर कार्यवाही झाली की नाही याची देखील खात्री या विभागातील कर्मचाऱ्यांनी करावी असेही महापौरांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर