
ठाणे, 01 जुलै, (हिं.स.)। : क्षयरोग झालेल्या रुग्णांना उपचाराबरोबर पौष्टिक आहार मिळणे देखील महत्वाचे आहे. ठाणे महापालिका व रोटरी यांच्यामार्फत क्षयरुग्णांना वाटप करण्यात आलेल्या फूडबास्केटमधील धान्यांचा आहारामध्ये निश्चितच उपयोग होणार असून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1 जुलै या डॉक्टर दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग (टीबी) रुग्णांसाठी पौष्टिक आहारयुक्त फूड बास्केटचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन ठाणे महानगरपालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले. या उपक्रमाद्वारे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांना आवश्यक पोषणमूल्ये मिळावीत आणि उपचारांचा परिणाम अधिक प्रभावी व्हावा यासाठी फूड बास्केटचे वाटप महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे यांच्यासह रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, डॉ. सोनल बनगाडे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या पदाधिकाऱ्यांनी क्षयरुग्णांच्या उपचारांबरोबरच त्यांना पौष्टिक आहार मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून रुग्णांना फूड बास्केटचे वितरण करण्यात येत असून हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. रोटरीच्या विविध क्लबमधील हजारो सदस्यांच्या सहभागातून क्षयरोग निर्मूलनासाठी मोठे योगदान दिले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचा डॉक्टर दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी महानगरपालिका आरोग्य सेवांमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रुग्णांना २४x७ उपलब्ध असणारी अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून एका फोनवर १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले व या उपक्रमाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच सीआर वाडिया परिसरात उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेत विविध रक्त व वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून तपासणी अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सुविधाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले. रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांचे हे संयुक्त प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर