आडगाव बाजार येथील पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह दौडगाव शिवारात आढळला
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आलेल्या पुराचा फटका एका शेतकरी महिलेला जीव गमावून बसावा लागला. पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेल्या मंगलबाई शेषराव खंडागळे यांचा मृतदेह बुधवारी (दि. 1) द
आडगाव बाजार येथील पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह दौडगाव शिवारात आढळला


परभणी, 01 जुलै (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आलेल्या पुराचा फटका एका शेतकरी महिलेला जीव गमावून बसावा लागला. पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेल्या मंगलबाई शेषराव खंडागळे यांचा मृतदेह बुधवारी (दि. 1) दुपारी औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारात आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगलबाई खंडागळे या शेतातील काम आटोपून घरी परतत असताना गावालगतच्या ओढ्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत जीवाची पर्वा न करता त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार आणि पुराच्या वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बुधवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकासह ग्रामस्थांनी पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. अखेर दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. मंडळाधिकारी राधा कदम, तलाठी प्रवीण मांटे आणि कृषी सहायक शिवशंकर खेडेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मंगलबाई खंडागळे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या मोहन शेषराव खंडागळे यांच्या मातोश्री होत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande