
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव बुधवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाची साठवण क्षमता ५४५ कोटी लीटर असून याचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५,४५५ दशलक्ष लिटर) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी