
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा लाल बावटा लावण्यात आला आहे. येत्या २ ते ५ जुलै या काळात नारिंगी बावटा लावण्यात येणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच २ जुलै ते ५ जुलै कालावधीत जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. घाटावर आणि कोकणात या काळात दरडी कोसळण्याचा आणि सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी