ठाण्यात धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करावे : महापौर
ठाणे, 01 जुलै (हिं.स.) : मुंबई येथे मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज महापौर दालनात वृक्षप्राधिकरण विभागाची तातडीची बै
ठाणे


ठाणे, 01 जुलै (हिं.स.) : मुंबई येथे मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज महापौर दालनात वृक्षप्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

या बैठकीस सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी, उपायुक्त मधुकर बोडके, सहायक आयुक्त राजेश सोनावणे तसेच वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते.

शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे, त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले

धोकादायक, वाळलेली किंवा कललेली झाडे तसेच मोठ्या फांद्या तातडीने ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

महापौरांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षप्राधिकरण विभागाने सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही दिल्या. नागरिकांनीही धोकादायक वाटणाऱ्या झाडांची माहिती तातडीने महानगरपालिकेला कळवावी, असेही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande