
रायगड, 14 जुलै (हिं.स.)। नेरळ–दहिवली पुलाला अलीकडील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित करावे, अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख तथा राजेंद्रनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी तहसीलदार कर्जत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ–दहिवली पूल खचला असून पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तसेच आधारासाठी असलेले राऊंड रॉड उखडले गेले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. पुलाच्या झालेल्या नुकसानीची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
नेरळ–मुरबाड मार्ग हा स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने पुलाची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संदीप उतेकर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)