
बीड, 14 जुलै (हिं.स.)। नीट (NEET-UG) २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत जंतरमंतरवर गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, केंद्र सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, वांगचुक यांचे प्राण वाचवावेत आणि शिक्षणमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आज मंगळवारी अंबाजोगाई येथील सजग नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
तीन मे २०२६ रोजी राजस्थानमधून नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची मोठी घटना समोर आली. या भयंकर गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी देशभरात संतापाची लाट असून अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना पाठीशी घालत, एका निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवाशी खेळण्याचा असंवेदनशील प्रकार केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा घणाघात संतप्त नागरिकांनी केला आहे.
सोनम वांगचुक हे देशाचे भूषण आहेत आणि त्यांचे अस्तित्व समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यामुळे सरकारने आपली ताठर भूमिका सोडून वांगचुक यांचे उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ पुढाकार घ्यावा आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.
हे निवेदन अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात आणि निवेदन देताना अमर हबीब, नानासाहेब गाठाळ, कालिदास आपेट, सुदर्शन रापतवार, धिमत राष्ट्रपाल, अनिकेत लोहिया, अच्चुत आंगणे, बब्रुवान पोटभरे, अजय बुरांडे, दगडू लोमटे, शैलेजा बरुरे, अरुंधती पाटील, सुनील सौंदरमल, कमलाकर कांबळे, डी. जी. धाकडे, वसंतराव मोरे आणि अनंत जगतकर आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis