
कारकास, 15 जुलै (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये सुमारे तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 4,700 च्या पुढे गेली आहे. तसेच, सुमारे 17,000 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली. 24 जून रोजी व्हेनेझुएलामध्ये रिश्टर स्केलवर 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन भीषण भूकंप झाले होते. हे दोन्ही धक्के अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने जाणवले, ज्यामुळे किनारपट्टीवरील ला ग्वायरा राज्याचे मोठे नुकसान झाले.
व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे प्रमुख जॉर्ज रोड्रिग्ज यांनी शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत किमान 4,734 जणांचा मृत्यू झाला असून 16,740 जण जखमी झाले आहेत. तथापि, त्यांनी सांगितले की रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतेक जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, या भीषण भूकंपांनंतर सुमारे 50,000 लोक अजूनही बेपत्ता आहेत. भूकंपादरम्यान शेकडो इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू असून, बचाव पथके बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode