
वर्धा, 20 जुलै (हिं.स.)। हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रोहित ट्रेडर्स या दुकानावर छापा घालून पोलिसांनी तब्बल १ लाख ६४ हजार ९३ रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित त्रिलोकचंद नाहर आणि त्याला माल पुरवणाऱ्या सोएल नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, वडनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार घनश्याम पाटील आणि सह पोलिस कर्मचाऱ्यांनी पोहणा येथील वाॅर्ड क्रमांक १ मधील रोहित ट्रेडर्स या दुकानाची तपासणी केली. दुकानाचे मालक रोहित त्रिलोकचंद नाहर (वय ३६) यांच्या उपस्थितीत ही झडती घेण्यात आली. या तपासणी दरम्यान दुकानात प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू आणि अन्न पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विश्लेषणासाठी अन्न पदार्थांचे प्रातिनिधिक नमुने घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित १ लाख ६४ हजार ९३ रुपयांचा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला. पोलिस चौकशी दरम्यान आरोपी दुकानदार रोहित नाहर याने हा प्रतिबंधित माल त्याला सोएल नामक व्यक्तीने आणून दिला होता. रोहित त्रिलोकचंद नाहर (रा. पोहणा, हिंगणघाट) आणि पुरवठादार सोएल यांच्याविरुद्ध तंबाखूची अवैध साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी