यवतमाळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापे; ३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) | शहरातील तारपुरा, भोसा शिवारातील नाल्याकाठी तसेच तालुक्यातील भांबराजा येथील निसर्ग धाब्यावर सोमवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकले. यात दोन बेवारस आणि चार वारस, असे मिळून सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापे; ३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त


यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) | शहरातील तारपुरा, भोसा शिवारातील नाल्याकाठी तसेच तालुक्यातील भांबराजा येथील निसर्ग धाब्यावर सोमवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकले. यात दोन बेवारस आणि चार वारस, असे मिळून सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहे. तर तीन लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैधरीत्या दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती उत्पादन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या पथकाने सोमवारी पहिली कारवाई शहरातील तारपुरा परिसरात केली. तर दुसर्या कारवाईत भांबराजा येथील निसर्ग धाबा आणि तिसरी कारवाई भोसा शिवारातील नाल्याकाठी केली. या कारवाईत एकूण सात हजार ६०० लिटर मोहासडवा, २६५ लिटर हातभट्टी दारू, ७.५६ लिटर विदेशी दारू, नऊ लिटर बिअर, इतर साहित्य, असा एकूण तीन लाख 38 हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहासडवा, लोखंडी ड्रम, प्लास्टिक ड्रम, भट्टीचे इतर साहित्य तारपुरा, यवतमाळ येथील सुलभ सौच्छालयाला लागून असलेल्या खोलीबाहेर काढून नाश करण्यात आले आहे. तसेच भोसा शिवारातील नाल्याकाठी आरोपी मिळून न आल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून मोहासडवा जागीच ओतून नाश करण्यात आला. या प्रकरणात निरंजन वामन भोयर (रा. जामनकर नगर), गंगाराम बळिराम ठाकरे (रा. भांबराजा), सुदेश छेदीलाल कैथवास (रा. तारपुरा), यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande